राज्याचा कारभार आता 'एअर इंडिया'तून

राज्याचा कारभार आता 'एअर इंडिया'तून

 


  • २३ मजली इमारतीची १,६०७ कोटी रुपयांना खरेदी; नूतनीकरण वेगात
  • मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रिमंडळ बैठकीसाठी स्वतंत्र मजला
  • मुंबई : मंत्रालयातील जागेची टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडून खरेदी केलेल्या नरिमन पॉईंट येथील २३ मजली 'एअर इंडिया' इमारतीचे नूतनीकरण वेगाने सुरू आहे. विशेषतः, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी २२ वा मजला आणि मुख्यमंत्री कार्यालयासाठी २३ व्या मजल्यावरील कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची लगबग सुरू आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या दोन महिन्यांपासून एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण सुरू असून, पुढील ३ ते ४ महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. इमारतीमध्ये १५२ वाहनांच्या पार्किंगची सोय असून, दोन्ही बाजूंनी स्वतंत्र प्रवेशद्वारे असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. मंत्रालयात पुरेशी जागा नसल्यामुळे राज्य सरकारचे महत्त्वाचे विभाग सध्या बाहेर मांडलेल्या जागेत आहेत.

    एअर इंडिया इमारतीवर झळकणार 'महाराष्ट्र शासन'

    एअर इंडियाची मध्यवर्ती इमारत राज्य सरकारने केंद्र सरकारकडून १,६०७ कोटी रुपयांना खरेदी केली. त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने पूर्वीच्या मागणीनुसार १८१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या इमारतीवर आता 'महाराष्ट्र शासन' असा नामफलकही लावण्यात आला आहे.

    शासनाला ९ लाख चौरस फूट जागेपैकी त्यातील तब्बल ७०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. आता आरोग्य भवन, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारखे सर्व विभाग एअर इंडियाच्या इमारतीत एकाच छताखाली आणले जाणार आहेत.

    २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय, २२ वा मजला कॅबिनेट हॉल

    संपूर्ण इमारतीचे काम पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्र्यांचे कार्यालय २३ व्या मजल्यावर आणि २२ व्या मजल्यावरील ११,९३,३६३ चौरस फुटांचा कॅबिनेट हॉल प्राधान्याने पूर्ण केला जाणार आहे.