बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण अभिवादन..!
बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त (दि:२२) रोजी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहर पक्ष कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच "अमर रहे... अमर रहे... अजितदादा अमर रहे..." या घोषणांनी पक्ष कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे, नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, पुणे जिल्हा सरचिटणीस प्रा. आजिनाथ चौधर, विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने, राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुरज देवकाते यांच्यासह बारामती नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्यकारणी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी तसेच पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी होते. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि समाजकारणातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. बारामतीसह राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये ज्योतिबा मंदिर येथे महाआरती, मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृद्धाश्रमातील महिलांना साडी वाटप, वृक्षारोपण, पुणे-बारामती सायकल स्पर्धा, गुरुद्वारामध्ये अखंड पाठ तसेच पावसाळी रेनकोट वाटप असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण महिनाभर "जनसेवा महिना" विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असून, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला खरी आदरांजली वाहण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
