जु‘लै’ भारी, पावसाच्या सरी, राज्यभरात सुरू झाल्या कोसळधारा, कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा; पालघरसह पुण्याला आज रेड अलर्ट

जु‘लै’ भारी, पावसाच्या सरी, राज्यभरात सुरू झाल्या कोसळधारा, कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा; पालघरसह पुण्याला आज रेड अलर्ट

 


मुंबई: जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलै उजाडताच आता पावसाने राज्यात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रासह खान्देशात पावसाने जोर पकडला आहे. 

महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरातून पसरली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत ६ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. तर, गुरुवारी (दि. २) पालघरसह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील परिसरांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूरला याच दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा देण्यात आला असून, महाराष्ट्रात आठवडाभर सरींचा जोर कायम राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज असून, विदर्भात जवळपास सर्वच भागांत व्यापक सरी कोसळतील. मराठवाड्यात २ आणि ३ जुलै रोजी जोर वाढण्याची शक्यता असून, इतर दिवशी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

आज मुसळधारांची शक्यता
२ ते ४ जुलै दरम्यान कोकणातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २ आणि ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ ते ६ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. ४ जुलैपर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. 

तीन दिवस धुवाधार 
३ जुलै : रायगड व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील परिसराला रेड अलर्ट असून, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, अमरावतीला ऑरेंज अलर्ट आहे.
४ जुलै : रायगड, ठाणे जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील परिसरांना रेड अलर्ट असून, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आहे.
५ जुलै : संपूर्ण कोकण पट्ट्याला ऑरेंज अलर्ट आहे. 

बाल्कनी कोसळून एकाचा मृत्यू तर कुर्ल्यात दगड आणि माती घसरली
मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला असून, पश्चिम उपनगरात सर्वाधिक १०९.१६ मिमी पावसाची नोंद झाली, तर शहरात ८६.९४ मिमी व पूर्व उपनगरात ८६.७६ मिमी सरासरी पाऊस पडला. 
३० जून रोजी रात्री ११:२२ वाजता वाळकेश्वरमधील बाबुलनाथ रोड येथील म्हाडाच्या उपकरप्राप्त सूर्याप्रकाश इमारतीची बाल्कनी कोसळली. या दुर्घटनेत जवळच्याच पेट्रोल पंपावर काम करणारे संतोष भारस्कर (५१) हे ठार झाले. ३० जून रोजी रात्री १० वाजता कुर्ला (पश्चिम) येथील एस. जी. बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनीसमोरील डोंगराळ भागातून दगड आणि माती खाली घसरल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 
२९ जून रोजी दुपारी वाशी खाडीमध्ये वाहून गेलेले मोहम्मद अली खान (३३) यांचा मृतदेह १ जुलै रोजी ट्रॉम्बे जेट्टी येथे आढळून आला. 

मुंबईत पावसाशी संबंधित घटना
झाडे/फांद्या पडणे : एकूण ९० ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडण्याच्या तक्रारी (शहर : ३६, पूर्व उपनगर : २३, पश्चिम उपनगर : ३१)
शॉर्टसर्किट : एकूण ३० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना.
घरे/भिंती पडणे : एकूण ६ ठिकाणी घराचा किंवा भिंतीचा भाग पडल्याच्या तक्रारी.