“शिक्षकांच्या न्याय्य मागण्या सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
आमदार ॲड. किरण सरनाईक हे अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर आपल्यासोबत काम करत आहेत. आता त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत असून राज्याच्या विकासाला गती देणारे निर्णय घेत आहे. शिवसेनेची कार्यपद्धती आणि महायुती सरकारची जनहिताची भूमिका पाहून सरनाईक यांनी हा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न
अमरावती शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार किरण सरनाईक यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. सरकारसोबत झालेल्या विविध बैठका आणि चर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विधान परिषदेत शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी प्रभावी आवाज उठवला. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले असून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. महायुती सरकारने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित प्रश्नही लवकरच सोडविले जातील, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावल्याची आठवण करून देत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण एक सक्षम टीम म्हणून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, आई-वडील जन्म देतात; पण संस्कार करण्याचे काम शिक्षक करतात. देशाचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे समाजात आई-वडिलांनंतर शिक्षकांचे स्थान सर्वाधिक मानाचे आहे. आमदार किरण सरनाईक यांना उद्देशून ते म्हणाले की, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तुम्ही ज्या पद्धतीने लढत आहात, त्याच ताकदीने पुढेही काम करत राहा. तुमच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आणि महायुती सरकार ठामपणे उभी आहे. शिक्षकांच्या उर्वरित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासमवेत अधिवेशन काळात विशेष बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक बाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणल्या जातील आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी हमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.