हातात पिस्तूल घेऊन व्हिडिओ व्हायरल; कुरकुंभच्या तरुणावर गुन्हा दाखल
कुरकुंभ: सोशल मीडियावर हातात पिस्तूल घेऊन व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमात प्रसारित करत दहशत निर्माण केल्याप्रकरणी कुरकुंभ येथील एका तरुणाविरुद्ध दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप भागवत असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पोपट भागवत (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याने ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ गाव हद्दीत त्याच्या ताब्यातील पिस्तूल कोणतीही सुरक्षिततेची खबरदारी न घेता हातात उघडपणे बाळगून त्याचे जाहीर प्रदर्शन केले. तसेच पिस्तूलासह स्वतःचा व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. या कृतीमुळे नागरिकांमध्ये धाक व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग माणिक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५, आर्म्स ॲक्ट १९५९ चे कलम ३० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), ३७(३) सह कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई ८ जुलै रोजी रात्री करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत.