अजितदादा पवारांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' द्या; राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अजितदादा पवारांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' द्या; राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि राज्याच्या राजकीय, सामाजिक तसेच आर्थिक विकासात स्वर्गीय अजितदादा पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून राज्याच्या विकासासाठी सातत्याने काम केले. कुशल प्रशासक, अभ्यासू नेतृत्व आणि लोकाभिमुख निर्णयक्षमतेमुळे त्यांनी राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली, असे निवेदनात म्हटले आहे.

विकासकामांचा उल्लेख

अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे विविध विकासकामांना गती दिली. रस्ते, पूल, पाटबंधारे, शेती, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांना चालना मिळाली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी योगदान

शेतकरी हिताच्या विविध योजना, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत, तसेच समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे निवेदनात नमूद आहे. प्रशासनावर प्रभावी पकड आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे राज्याच्या विकासात त्यांचे योगदान विशेष ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘पद्मविभूषण’ पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे अधिकृत शिफारस पाठवावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार आणि विधानपरिषद सदस्यांच्या वतीने ही मागणी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.