E20 इंधनाविरोधात आंदोलनाची हाक; मोर्चा निघण्यापूर्वीच पेट्रोलियम मंत्र्यांनी घेतली आंदोलकांची भेट
ई-२० पेट्रोलबाबत केलेल्या अंमलबजावणीविरोधात टीम भारत या संघटनेने ३१ जुलै रोजी नवी दिल्लीतील संसद मार्गावर गाडी मार्च काढण्याची घोषणा केली होती. मात्र, हे आंदोलन रस्त्यावर उतरण्याआधीच, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी तातडीने बैठक घेऊन चर्चा केली.
केंद्र सरकारने देशात इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल अंतर्गत २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्रीचा निर्णय घेतला आहे. मात्र, एप्रिल २०२३ पूर्वी तयार करण्यात आलेल्या वाहनांच्या इंजिनसाठी हे इंधन योग्य नसून, यामुळे वाहनांचे इंजिन खराब होत आहे, मायलेज घटते आहे आणि खर्च वाढला आहे, असा आरोप वाहनचालक करत आहेत. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही या धोरणाला विरोध दर्शवला असून याविरोधात १ ऑगस्ट रोजी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये निषेध सभा आयोजित केली आहे.
चार तास सुरु होती उच्चस्तरीय बैठक
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली टीम भारत या संघटनेच्या प्रतिनिधींसोबत जवळपास चार तास बैठक चालली. सुरुवातीला फक्त पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होईल असे अपेक्षित असताना खुद्द मंत्री हरदीप सिंग पुरी या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत कृषी आणि उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.