बारामतीत शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ३ कोटी ७३ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामतीत शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ३ कोटी ७३ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 


बारामती: बारामती शहर आणि परिसरातील बेरोजगार युवकांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ३ कोटी ७३ लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फसवणुकीत तब्बल ११७ उमेदवारांची फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी रणजित हरिभाऊ मोढे (वय ३६, व्यवसाय – लेबर कॉन्ट्रॅक्टर, रा. बारामती) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, सुबायू सरकार उर्फ राणा आणि प्रमोद भगवान गुरव यांनी आरोग्य विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, समाजकल्याण विभाग, रेल्वे तसेच इतर विविध शासकीय खात्यांमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा आरोप आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट निवड यादी, बनावट शासकीय शिक्के आणि बनावट नियुक्तीपत्रांचा वापर केला. त्यामुळे अनेक उमेदवारांना प्रत्यक्षात शासकीय नोकरी मिळणार असल्याचा विश्वास बसला आणि त्यांनी लाखो रुपये आरोपींकडे जमा केले.
तक्रारीनुसार, सन २०२३ ते २०२४ या कालावधीत एकूण ११७ उमेदवारांकडून ऑनलाइन व्यवहार तसेच रोख स्वरूपात मिळून ३ कोटी ७३ लाख स्वीकारण्यात आले. मात्र, कोणत्याही उमेदवाराला प्रत्यक्ष शासकीय नोकरी मिळवून न देता आरोपींनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही बाब उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे यासंदर्भातील संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रे, बँक खात्यांतील व्यवहार तसेच इतर पुराव्यांची पडताळणी सुरू असून, फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात आणखी काही पीडित किंवा इतर संबंधित व्यक्ती समोर येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.