बारामती दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित आर्थिक व्यवहारांचा व्हिडिओ व्हायरल; चौकशीची मागणी
बारामती: बारामती येथील दुय्यम निबंधक (Sub-Registrar) कार्यालय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. कार्यालयात कथित आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
व्हिडिओतील दृश्यांबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
घर, फ्लॅट, प्लॉट किंवा इतर स्थावर मालमत्तेची खरेदी करताना नागरिक आपल्या आयुष्यभराची कमाई खर्च करून खरेदीखत नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात येत असतात. मात्र, कार्यालयात काही कामे पैशांशिवाय होत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असताना अधिकारी व कर्मचारी थेट पैसे घेतानाच व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.या व्हिडिओमध्ये कथितरित्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर रोख रक्कम ठेवली जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता किंवा त्यामधील घटनांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी समोर उघड झालेली आहे .
दरम्यान,बारामतीत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या काही अधिकारी आणि एजंट यांच्या संगनमतातून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे समोर आल्यामुळे वरिष्ठ कोणती कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषी लोकांच्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून,संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल,प्रशासन या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन चौकशी करणार का आणि यामागील सत्य काय आहे,याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.