कॉकरोच जनता पार्टी पुन्हा अॅक्शन मोडमध्ये! संभाजीनगरात दोन दिवसांची बैठक, ६ ऑगस्टला मोठा निर्णय?
संभाजीनगर: जंतर-मंतरवरील आंदोलनाने राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आता पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. संस्थापक अभिजीत दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी दोन दिवसांच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.
दिल्लीहून CJP ची प्रमुख टीम छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली असून, ५ आणि ६ ऑगस्ट रोजी या बैठका पार पडणार आहेत. तरुणांच्या चळवळीबाबत आणि झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाबाबत ६ ऑगस्ट रोजी मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण कोण उपस्थित?
या बैठकीसाठी पक्षाचे प्रमुख आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह इतर प्रमुख सहकारी संभाजीनगरमध्ये उपस्थित राहिले आहेत. बैठकीला CJP चे एकूण सात प्रमुख सदस्य आणि चळवळीत सहकार्य करणारे इतर सहकारी उपस्थित आहेत.
५ आणि ६ ऑगस्टला काय घडणार?
या दोन दिवसीय बैठकीबाबत बोलताना CJP चे सौरव दास यांनी माध्यमांना सांगितले की, "आमची ५ आणि ६ ऑगस्ट रोजी दोन दिवसांची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. CJP चे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि प्रवक्ते या बैठकीला उपस्थित आहेत. या दोन दिवसांत आम्ही पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत."
तरुणाईच्या या व्यापक चळवळीला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे, याचा ठोस रोडमॅप या बैठकीत तयार केला जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय ६ ऑगस्ट रोजी थेट माध्यमांसमोर जाहीर केला जाणार असल्याचेही सौरव दास यांनी सांगितले.
झारखंडमधील आंदोलनाला आमचा पाठिंबा
सौरव दास पुढे म्हणाले, "झारखंडमधील सर्व आंदोलक विद्यार्थ्यांना आमचा पूर्ण आणि ठाम पाठिंबा आहे." अभिजीत दीपके आणि आशुतोष रांका यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.