राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

 


मुंबई: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप मतदार यादीत नाव नोंदवता न आलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मोहीम आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बदल करून आयोगाने नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी मतदान केंद्रांचे पुनर्गठन केले जाणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीवर नागरिकांना हरकती किंवा दावे नोंदवण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर हा कालावधी उपलब्ध असेल.

या कालावधीत प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी, सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर सर्व आवश्यक दुरुस्त्या करून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.

दरम्यान, ज्यांचे नाव अद्याप मतदार यादीत नाही किंवा नाव, पत्ता अथवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करायची आहे, त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची माहिती किंवा खोटी घोषणा केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, अशा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.