बारामतीत बुलेट चोरीचे सत्र; अवघ्या काही दिवसांत ६ बुलेट चोरीला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू

बारामतीत बुलेट चोरीचे सत्र; अवघ्या काही दिवसांत ६ बुलेट चोरीला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू

 

बारामती: बारामती शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून Royal Enfield बुलेट मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन, तर बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतही तीन बुलेट चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बुलेट मोटारसायकलींना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, ६ ऑगस्टच्या रात्री १० ते ७ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेपर्यंत प्रगतीनगर येथील प्रभावती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दोन Royal Enfield मोटारसायकली चोरीला गेल्या. यामध्ये MH-42/AV-2121 क्रमांकाची Classic 350 आणि MH-42/BK-0749 क्रमांकाची Hunter 350 यांचा समावेश असून दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत २ लाख ६० हजार रुपये आहे.

तसेच ९ ऑगस्टच्या रात्री ११ ते १० ऑगस्टच्या सकाळी ७ वाजेपर्यंत तांदुळवाडी रोडवरील के-मार्टच्या पाठीमागील प्रगतीनगर येथील आर्या पॅराडाईस अपार्टमेंटच्या पार्किंगमधून MH-42/BK-9709 क्रमांकाची मेटल ग्रे रंगाची Royal Enfield Classic 350 चोरीला गेली. या वाहनाची अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

चोरीच्या घटनांनंतर बारामती शहर पोलिसांनी परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याचे बारकाईने विश्लेषण सुरू केले आहे. संशयित चोरट्यांच्या हालचालींबाबत महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपास पथके कार्यरत आहेत.

प्राथमिक निरीक्षणानुसार, अपार्टमेंट, सोसायटी तसेच तुलनेने कमी वर्दळ असलेल्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बुलेट मोटारसायकली चोरट्यांकडून लक्ष्य केल्या जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी केवळ हँडल लॉकवर अवलंबून न राहता अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहनधारकांनी घ्यावी ही खबरदारी

  •     हँडल लॉकसोबत मजबूत डिस्क लॉक, व्हील लॉक किंवा चेन लॉक वापरावे.
  •     शक्य असल्यास वाहन सुरक्षित लोखंडी संरचनेला चेन लॉकने बांधावे.
  •     वाहन सीसीटीव्ही च्या कक्षेत आणि प्रकाश असलेल्या ठिकाणी पार्क करावे.
  •     सोसायटीच्या पार्किंग व प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कार्यरत आहेत की नाही, याची खात्री करावी.
  •     पार्किंग परिसरात संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी.
  •     वाहनाला जीपीएस ट्रॅकर किंवा चोरीविरोधी अलार्म बसवण्याचा विचार करावा.
  •     आरसी, इंजिन व चॅसी नंबर तसेच वाहनांचे फोटो मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवावेत.

    कमी किमतीत बुलेट किंवा तिचे सुटे भाग विक्रीसाठी देणाऱ्या संशयित व्यक्तींबाबत तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

चोरीच्या घटनांचा तपास सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा चोरीच्या घटनांशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास बारामती शहर पोलीस स्टेशन अथवा डायल ११२ वर तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख आवश्यकतेनुसार गोपनीय ठेवण्यात येईल.

- प्रभारी पोलिस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण