ताशी ८५ किमी वेगाने वारे; १९ राज्यांना पावसाचा इशारा, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारचा समावेश

ताशी ८५ किमी वेगाने वारे; १९ राज्यांना पावसाचा इशारा, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारचा समावेश

 

नवी दिल्ली : उत्तर भारतातील बहुतांश भागांत मान्सून सक्रिय आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) नवीन इशारा जारी केला आहे. यानुसार सोमवारी उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहारसह १९ राज्यांसाठी वादळी वारे तसेच मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या काळात वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ८५ किमी.पर्यंत राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व भारतातील राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डोंगरी भागांत भूस्खलनाची, तर जोरदार वादळामुळे झाडे उन्मळून पडण्याची शक्यता पाहता सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. घनदाट जंगल भागातून प्रवास टाळावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. शेतकरी आणि मच्छिमारांना नद्या - समुद्रापासून दूर जाण्यास सांगण्यात आले आहे. 

ईशान्येत पूरस्थिती भयंकर

ईशान्येत अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीममध्ये पावसामुळे पूरस्थिती असून, अरुणाचलमध्ये आलेल्या पुरात पाच जवान बेपत्ता झाले आहेत. तर, सुबनसिरी जिल्ह्यात भूस्खलनात चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

हिमाचलमध्ये ११८ रस्तेमार्ग बंद, ५ जिल्ह्यांना अलर्ट

शिमला :हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे ११८ रस्तेमार्ग बंद आहेत. सोमवार आणि मंगळवारी पाच जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे २१६ पाणीपुरवठा योजना आणि १९ वीज केंद्रांवर परिणाम झाला आहे. राज्यात ३० जूनपासून आतापर्यंत पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांत ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुसळधार, वादळी वारे, गारपिटीचा इशारा

आयएमडीने उ. प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, ओडिशा, प. बंगाल, सिक्कीम, आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागासाठी ताशी ८० ते ८५ किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तसेच काही राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे.