'शनिवार माझ्या आवडीचा', चोरी करायला पुण्यातून मुंबईला यायची अनघा जोशी, फक्त शनिवारीच मारायची डल्ला, लाखोंचा ऐवज जप्त
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६
Edit
पुणे: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये
महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि मंगळसूत्र लांबवणाऱ्या एका ६५
वर्षीय वृद्ध महिलेला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अनघा जोशी असं या
आरोपी महिलेचं नाव असून ती पुण्यातील रहिवासी आहेत.
साध्या आणि शांत दिसणाऱ्या या वयस्कर महिलेनं कौटुंबिक संकटांमुळे हतबल होऊन हा गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याचं तपासात समोर आलं आहे.
'लकी' शनिवारीच करायची चोरी
पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अनघा जोशी यांच्या मुलाचा अपघातात
मृत्यू झाला होता, तर पतीचा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झाला. घर चालवणे
आणि रोजचा खर्च भागवणे कठीण झाल्यामुळे त्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली.
मात्र, या चोऱ्यांमागे एक अजब अंधश्रद्धा होती. त्या फक्त महिन्याच्या
पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारीच पुण्यातून मुंबईत चोरी करण्यासाठी येत असत.
इतर दिवस आपल्यासाठी 'लकी' नाहीत, असा त्यांचा समज होता.
CCTV फुटेज आणि पोलिसांची कारवाई
२ मे रोजी दादर रेल्वे स्थानकात बोरीवली लोकल पकडणाऱ्या एका ४४ वर्षीय
महिला बँकरच्या गळ्यातील ६७,००० रुपयांची सोन्याची साखळी व पेंडंट चोरीला
गेले. यानंतर महिनाभरानंतर ६ जून रोजी दादर येथेच बोरीवली लोकलमध्ये चढताना
एका फायनान्स एक्झिक्युटिव्ह महिला कर्मचाऱ्याचे ८९,००० रुपयांचे
मंगळसूत्र आणि सोन्याची साखळी ओढून लांबवण्यात आली.
या दोन्ही तक्रारींनंतर पोलीस उपायुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे आणि वरिष्ठ
पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दादर
स्थानकातील CCTV फुटेज तपासले. दोन्ही घटनांच्या वेळी महिला डब्याजवळ एक
वृद्ध महिला घुटमळताना पोलिसांना दिसली. संशय आल्यानंतर पोलिसांनी तिच्या
हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आणि तिसऱ्या महिला प्रवाशाला लक्ष्य
करण्याच्या प्रयत्नात असताना तिला रंगेहात पकडले. याबाबतचं वृत्त टाईम्स ऑफ
इंडियाने दिलं आहे.
चोरीचे सोने पुण्यात विकले
अटकेनंतर अनघा जोशी यांनी २० वर्षांपूर्वीही त्या अल्पकाळासाठी चेन
स्नॅचिंगमध्ये सहभागी असल्याचे कबूल केले. त्यांनी मुंबईतून चोरलेले सोने
पुण्यात नेऊन सराफांना विकले होते. पोलिसांनी पुण्यातील सराफांकडून चोरीचे
दागिने जप्त केले असून, सध्या अनघा जोशी न्यायालयीन कोठडीत आहेत.