“२०१४ पासूनच्या सर्व परीक्षांची चौकशी होणार”; हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, झारखंड लोक सेवा आयोग-सीजीएल परीक्षा अखेर रद्द

“२०१४ पासूनच्या सर्व परीक्षांची चौकशी होणार”; हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, झारखंड लोक सेवा आयोग-सीजीएल परीक्षा अखेर रद्द

 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी (ता. १०) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झारखंड लोक सेवा आयोग-सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. सोरेन सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी मान्य केली आहे. “२०१४ पासून झालेल्या सर्व लहान-मोठ्या त्रुटींची सखोल चौकशी केली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री सोरेन यांनी केली. परीक्षा वादाच्या केंद्रस्थानी असलेली खासगी चाचणी व आऊटसोर्सिंग फर्म ‘टीडीपीएल’ मार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा देखील रद्द करण्यात येत आहेत, असेही सोरेन यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सोरेन काय म्हणाले?

जयपाल सिंग स्टेडियमवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाने JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. “२०१४ पासून झालेल्या सर्व लहान-मोठ्या त्रुटींची सखोल चौकशी केली जाईल. तसेच केंद्र सरकारच्या एमएमडीआर कायद्यातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी आम्ही लवकरच बैठक बोलावू, आवश्यक असल्यास या विशिष्ट मुद्द्यावर विचारविनिमय करण्यासाठी आम्ही विशेष अधिवेशनही बोलावू शकतो,” असे हेमंत सोरेन म्हणाले.

एसआयटी, सीआयडी तपासात धक्कादायक खुलासे

एसआयटी आणि सीआयडी द्वारे सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याचे मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितले. “तपास सुरू असल्याने प्रत्येक तपशील सांगता येणार नाही, मात्र, सीबीएल प्रक्रियेमार्फत नियुक्त केलेली व्यक्ती आता जेपीएससी परीक्षांमधील गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक होत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय, येथे वेगवेगळ्या वेळी काम करणाऱ्या विविध कंपन्यांचे एक जाळे असल्याचे दिसते,” असे सोरेन म्हणाले. २०१४ पासून आजतागायत झालेल्या सर्व परीक्षांचा तपास या कक्षेत येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. संबंधित विभाग आणि सीआयडीला सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करणार – सोरेन

“टीडीपीएलशी संबंधित घेतलेल्या सर्व परीक्षा, जाहीर झालेले निकाल, निवड झालेले किंवा सहभागी झालेले उमेदवार आणि टीडीपीएलद्वारे चालवलेल्या इतर गोष्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे सोरेन यांनी नमूद केले. परीक्षांशी संबंधित सुधारणा आणि कथित गैरव्यवहारांमुळे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या समस्या दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.