दोन वर्षे फरार खूनातील आरोपीस बारामती शहर पोलिसांनी पकडले
बारामती: बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. ६४६/२०२४ या गंभीर खूनप्रकरणातील पाहिजे आरोपी अनिकेत संजय पवार, वय २० वर्षे, रा. जगतापमळा, खंडोबानगर, बारामती, जि. पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल ७२५ दिवस फरार होता. सदर आरोपीचा सातत्याने शोध सुरू असताना पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी हा बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील माळावरची देवी जवळील जवाहर पार्क परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
प्राप्त माहिती वरिष्ठांना कळवून पोलीस उपनिरीक्षक श्री. अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई सागर जामदार व पोलीस शिपाई विशाल शिंदे यांच्या पथकाने जवाहर पार्क परिसरात गोपनीयरीत्या सापळा रचला. आरोपी तेथे आल्यानंतर पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तत्काळ पाठलाग करून झडप घालत त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दि. १७/०८/२०२६ रोजी ११.५५ वाजता अटक केली.
सदर गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६४६/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०३(१), ६१(२), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९० तसेच संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले, वय ३९ वर्षे, व्यवसाय फोटोग्राफर, रा. अहिल्यादेवी चौक, जळोची, बारामती यांनी दिलेल्या प्रथम खबरीतील हकीकतीनुसार त्यांचा भाचा गणेश धुळाबापू वाघमोडे, वय १७ वर्षे, रा. जळोची, ता. बारामती, जि. पुणे याचे सन २०२३ मध्ये टी.सी. कॉलेज परिसरात जयेश बाबासाहेब माने व त्यांच्या साथीदारांशी भांडण झाले होते आणि त्या घटनेतून निर्माण झालेल्या पूर्ववैमनस्याच्या पार्श्वभूमीवर दि. २१/०८/२०२४ रोजी गणेश हा मित्रांसोबत कपडे खरेदी करून जळोचीच्या दिशेने परतत असताना त्याचा पाठलाग करण्यात आला.
जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तींनी त्यांचा रस्ता अडवून गणेशवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यानंतर नातेवाईक व मित्रांनी परिसरात शोध घेतला असता गणेश हा ओढ्याजवळील शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डोके, मान व शरीराच्या इतर भागांवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे प्रथम खबर अहवालात नमूद आहे.
या घटनेवरून दि. २२/०८/२०२४ रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान जयेश बाबासाहेब माने, शुभम प्रवीण गायकवाड, करण हनुमंत जाधव, आतिश संतोष गुरळकर, सोमनाथ रंगनाथ यादव, भोलया उर्फ किशोर बापू भिसे, बंडू भिवा काळे उर्फ बी.के., अनिकेत संजय पवार तसेच इतर आरोपींची भूमिका तपासण्यात आली.
विविध आरोपींना वेगवेगळ्या तारखांना अटक करण्यात आली, गुन्ह्यात वापरलेली वाहने व धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
थोडक्यात महत्वाचे
- पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी हा बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील माळावरची देवी जवळील जवाहर पार्क परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
- प्राप्त माहिती वरिष्ठांना कळवून पोलीस उपनिरीक्षक श्री. अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई सागर जामदार व पोलीस शिपाई विशाल शिंदे यांच्या पथकाने जवाहर पार्क परिसरात गोपनीयरीत्या सापळा रचला.
- आरोपी तेथे आल्यानंतर पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तत्काळ पाठलाग करून झडप घालत त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दि. १७/०८/२०२६ रोजी ११.५५ वाजता अटक केली.