जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत दहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; पोलिसांना चकवा देणाऱ्या संशयित शेजाऱ्याला अटक

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत दहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; पोलिसांना चकवा देणाऱ्या संशयित शेजाऱ्याला अटक

 


आळेफाटा : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या १० वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हा केल्यानंतर स्वतः पोलिसांसोबत शोधाशोध करण्याचे नाटक करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला आळेफाटा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळवंडी येथील रहिवासी योगेश पवार यांची इयत्ता ४ थीत शिकणारी मुलगी आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. दुपारी पालकांच्या अनुपस्थितीत आरोपीने संधी साधून हे घृणास्पद कृत्य केले. मुलगी घरात न दिसल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली; मात्र ती न सापडल्याने आळेफाटा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

​तपास सुरू असताना संशयित आरोपी स्वतः पोलिसांना मदत करण्याचे नाटक करत होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या ‘लेंडे स्थळ’ परिसरातील एका ओढ्याकाठी झाडाजवळ मुलीचा मृतदेह निष्प्राण अवस्थेत आढळून आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट; फॉरेन्सिक टीमकडून पाहणी

​घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशी द्या....!

अवघ्या १० वर्षांच्या बालिकेचा बळी घेणाऱ्या या नराधमावर जलदगती न्यायालयात (Fast Track Court) खटला चालवून त्याला लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली आहे.