पुण्याच्या महायुतीत भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र; नगरसेवकांचा निधी शुन्य केल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

पुण्याच्या महायुतीत भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र; नगरसेवकांचा निधी शुन्य केल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

 


पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या दोन नगरसेवकांचा विकास निधी काढून घेतल्याने महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष तीव्र झाला असून हा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलेल्या कामांची चौकशी करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला. यामुळे खवळलेल्या भाजपने बालवडकर आणि या प्रस्तावावर अनुमोदक म्हणून सही करणारे नगरसेवक सुहास टिंगरे यांचा विकास निधी काढून घेतला. या प्रकरणावरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. दोन पक्षातील संघर्ष वाढत आहे. या प्रकरणावरून सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तक्रार केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवक, आमदार आणि शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.

या घडामोडीनंतर आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विकास निधीचे वाटप आणि विभाजन समित्यांमध्ये अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना समान आणि न्याय्य संधी देण्याच्या सूचना पुण्यातील पदाधिकाऱ्यांना कराव्यात अशी मागणी केली आहे.