राहुल गांधी यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष
राहुल गांधी यांनी २४ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, आदिवासी विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागातून शहरांमध्ये शिक्षणासाठी येतात आणि शासकीय वसतिगृहांवर अवलंबून असतात. वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ३० वर्षांची वयोमर्यादा लागू करण्यात आल्याने शिक्षण पूर्ण करणाऱ्या किंवा विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. वसतिगृहांमधील अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांबाबतही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. काही ठिकाणी सर्पदंशासह अन्य घटनांमध्ये विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचे तसेच मृत्यू झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
तसेच दीर्घकाळ गैरहजेरीनंतर वसतिगृहात परतणाऱ्या विद्यार्थिनींची गर्भधारणा तपासणी तसेच अन्य वैद्यकीय तपासण्या केल्या जात असल्याची माहिती विद्यार्थिनींनी दिली. या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या सन्मानाचा प्रश्न निर्माण होत आहे. मुलींच्या वसतिगृहांशी संबंधित नियमांबाबतही त्यांनी पत्रातून चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात विविध शासकीय निर्णय रद्द किंवा सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ५ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेले शासन निर्णय रद्द करावेत तसेच ११ नोव्हेंबर २०११ रोजीच्या शासन निर्णयातील आर्थिक तरतुदी सध्याच्या महागाईनुसार वाढवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान, शासकीय आदिवासी वसतिगृहातील प्रवेशासाठी असलेली ३० वर्षांची वयोमर्यादा पूर्णपणे हटवावी किंवा ती ३६ वर्षांपर्यंत वाढवावी अशीही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेताना त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेट घ्यावी. त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती केली आहे.