विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी च्या सान्वी महाडीकची पुण्यात बाजी ; स्वलिखित नाट्यछटेने विभागीय अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक
बारामती: बाल रंगभूमी परिषद आयोजित स्व.मनीषाताई भाऊसाहेब भोईर नाट्यछटा स्पर्धा २०२६ च्या पुणे येथे पार पडलेल्या विभागीय अंतिम फेरीत विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सान्वी अमरेन्द्र महाडीक हिने इयत्ता ८ वी व ९ वीच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.विशेष म्हणजे, सान्वीने सादर केलेली‘माझा डाएट उद्यापासून सुरू’ ही नाट्यछटा तिची स्वतःची लेखनकृती असून, स्वलिखित नाट्यछटेच्या प्रभावी सादरीकरणातून तिने हे यश मिळवले आहे.
सान्वीच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्राताई पवार यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. सान्वीने आपल्या कलागुणांच्या जोरावर शाळेसह बारामतीचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या विविध २६ केंद्रांवर २,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.त्यातून सुमारे २६० विद्यार्थी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. विविध गटांतील गुणवंतांना एकूण ६४ पारितोषिके प्रदान करण्यात आली. सान्वी सहभागी असलेल्या इयत्ता ८ वी व ९ वीच्या गटात तब्बल ४६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.अशा अत्यंत चुरशीच्या गटातून अंतिम फेरीत मजल मारत सान्वीने आपल्या उत्कृष्ठ सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय पारितोषिकावर आपले नाव कोरले.
दैनंदिन जीवनातील ‘डाएट’ या विषयाकडे विनोदी आणि मिश्कील नजरेने पाहणारी ‘माझा डाएट उद्यापासून सुरू’ ही नाट्यछटा सान्वीने स्वतः लिहिली. विषयाची कल्पक मांडणी, सहज संवादफेक, आत्मविश्वासपूर्ण अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग यामुळे तिच्या सादरीकरणाने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. लेखन आणि अभिनय या दोन्ही पातळ्यांवर स्वतःची प्रतिभा सिद्ध केल्यामुळे सान्वीचे हे यश विशेष ठरले आहे.
अंतिम फेरीसाठी आकाश थिटे, निकिता वाणी, स्वप्नील खंबायत, चैताली जाधव आणि प्रीती केसकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
सान्वीच्या या यशामागे शाळेतील ज्योती दिसले मॅडम व अर्चना देव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका तनुश्री गोरे आणि विभागप्रमुख लीला शेट्टी यांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले.सान्वीची आई अॅड.प्रिया अमरेन्द्र महाडीक यांनी नाट्यछटेच्या तयारीपासून अंतिम सादरीकरणापर्यंत तिची विशेष तयारी करून घेत तिला सातत्याने प्रोत्साहन दिले.
पारितोषिक वितरण समारंभास बाल रंगभूमी परिषद (मध्यवर्ती,मुंबई) यांच्या अध्यक्षा अॅड. नीलिमाताई शिर्के-सामंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज डाळिंबकर यांनी केले,प्रास्ताविक दीपाली शेळके यांनी केले,तर आभार प्रदर्शन नारायण करपे यांनी केले.
प्राथमिक फेरीतून निवड होऊन विभागीय अंतिम फेरीपर्यंत मजल मारत आणि शेकडो स्पर्धकांच्या चुरशीत द्वितीय क्रमांक पटकावून सान्वीने विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर,पिंपळी आणि बारामतीचे नाव उज्वल केले आहे.तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षक विद्यार्थी,पालक,कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
