माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

 

कोल्हापूर : देशातील उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणारे थोर शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांचे कोल्हापूर येथे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या दीर्घायुष्यात शिक्षण, आरोग्य, राजकारण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा उत्तुंग ठसा उमटवला.

ग्रामीण शेतकरी कुटुंबापासून सुरू झालेला जीवनप्रवास

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील 'आंबप' या एका साध्या शेतीप्रधान गावात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला. एका बहुजन शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या ज्ञानदेवांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने स्वकर्तृत्वावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य पाल्यांना आणि बहुजन समाजाला जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण मिळाले पाहिजे, या ध्येयाने त्यांनी आयुष्यभर कार्य केले.

राजकीय वाटचाल आणि राज्यपाल पदाची जबाबदारी

डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक राजकारणातून केली. १९५७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून ते प्रथम कोल्हापूर नगरपालिकेवर निवडून आले आणि पुढे महापौर बनले. त्यानंतर १९६७ आणि १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत पन्हाळा मतदारसंघातून जनतेने त्यांना आमदार म्हणून विधानसभेवर पाठवले. पुढे २०१८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय अनुभवाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली होती, त्रिपुराचे राज्यपाल: २००९ ते २०१३ तर बिहारचे राज्यपाल: २०१३ ते २०१४ यासोबतच त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही अत्यंत कुशलतेने सांभाळला होता.

४५ वर्षी शिक्षणाचा 'वटवृक्ष' रोवला!

वयाच्या ४५ व्या वर्षी सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर जात त्यांनी शिक्षणाचा वटवृक्ष उभारण्यास सुरुवात केली. १९८३ मध्ये नवी मुंबईत 'रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान' (RAIT) या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या प्रवासाचा श्रीगणेशा केला. आज त्यांच्या 'डी. वाय. पाटील ग्रुप' अंतर्भूत ३ हून अधिक डीम्ड विद्यापीठे, ६ खाजगी विद्यापीठे आणि १८० पेक्षा जास्त लहान-मोठ्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत. मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूर यांसारख्या शहरांत पसरलेल्या या संस्थांमधून हजारो देश-विदेशी विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय (मेडिकल), दंतवैद्यकीय, व्यवस्थापन (मॅनेजमेंट), फार्मसी आणि कृषी शाखांचे उच्च शिक्षण घेत आहेत.

क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात सुवर्ण योगदान

केवळ शिक्षणच नव्हे, तर क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रातही त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या. नवी मुंबईतील प्रसिद्ध 'डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम' हे त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल (IPL) आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे यशस्वी आयोजन झाले. याशिवाय गरिबांसाठी अनेक चॅरिटेबल हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संशोधन केंद्रे सुरू करून त्यांनी आरोग्य सेवेत मोठा हातभार लावला.

'पद्मश्री' आणि मानद डॉक्टरेट पदव्यांनी सन्मान

शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' या देशातील उच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय वर्ल्ड युनिव्हर्सिटी राउंडटेबल, अमेरिका (१९८५), नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी, ब्रिटन (१९९६) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२०१५) या अग्रगण्य विद्यापीठांकडून त्यांना मानद डॉक्टरेट (D.Litt.) पदवी प्रदान करण्यात आली होती.

कर्तृत्ववान कुटुंबाचा वारसा

डॉ. डी. वाय. पाटील यांचा परिवार आजही सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात तितकाच सक्रिय आहे. त्यांचे पुत्र डॉ. संजय डी. वाय. पाटील, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, तसेच कन्या डॉ. नंदिता पालशेतकर हे शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तर नातू ऋतुराज पाटील हेही लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.