'गुंगी गुडिया' वक्तव्याचे बारामतीत पडसाद; काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; सुनेत्रा पवारांना दुग्धाभिषेक
बारामती: बारामती– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केल्याचा दावा करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्याचे पडसाद बारामतीत उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भिगवण चौकात जोरदार आंदोलन करत काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या निषेधार्थ पुतळा दहन केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्याप्रती समर्थन व्यक्त करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे सांगत, राजकीय मतभेद असले तरी महिलांचा सन्मान अबाधित ठेवला पाहिजे, अशी भूमिका मांडली. काँग्रेस नेतृत्वाने संबंधित वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
बीडमधील एका व्हिडिओवरून राज्यातील राजकारण तापले आहे. बीडच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत माध्यमांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारत असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप केल्याची घटना चर्चेत आली. त्यानंतर काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्यात आली.
या टीकेनंतर बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी भिगवण चौकात तीव्र निषेध नोंदवत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध केला.
यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भविष्यात महिलांबाबत अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा देत राजकीय टीका करताना सभ्य भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले. आंदोलन शांततेत पार पडले.