शिरूरमध्ये २२ लाखांचे ड्रग्ज जप्त; मॅफेड्रॉनसह दोघे परप्रांतीय तरुण जेरबंद

शिरूरमध्ये २२ लाखांचे ड्रग्ज जप्त; मॅफेड्रॉनसह दोघे परप्रांतीय तरुण जेरबंद

 


शिरूर : तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सुमारे २२ लाख रुपये किमतीचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ, दुचाकीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मलठण येथील राजावाडा चौकात ही कारवाई करण्यात आली.

सुरेंद्रसिंह भैलूसिंह राठोड ऊर्फ राजपूत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिश्नोई (वय ३१, दोघे सध्या रा. मनीष शिरोळे फार्म हाऊस, मलठण; मूळ रा. बांकियावास खुर्द, जि. बाडमेर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तुषार पंधारे आणि त्यांच्या पथकाला मलठण परिसरात काही जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मलठण येथील राजावाडा चौकात सापळा रचला.

संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे ५१ ग्रॅम वजनाचा लालसर-काळपट रंगाचा क्रिस्टल स्वरूपातील पदार्थ आणि ५७.५ ग्रॅम वजनाचा पांढऱ्या-पिवळसर रंगाचा मॅफेड्रॉन आढळून आले. दोन्ही पदार्थांचे एकूण वजन १०८.५ ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मॅफेड्रॉनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २० हजार रुपये प्रति ग्रॅम आहे. त्यानुसार जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे २१ लाख ७० हजार रुपये आहे. यासोबतच ड्रीम युगा मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ एमएस ५८८९) जप्त करण्यात आली. अमली पदार्थ आणि दुचाकीसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर करीत आहेत.