८-१० वर्षांपासून पोलीस चौकी बंद, आता चिमुरडीवरील अत्याचाराने गाव पेटले...! ग्रामस्थांचा एसपींना थेट सवाल
बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६
Edit
पिंपळवंडी (पुणे जि.) : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी
येथे चार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेने परिसरात संतापाची
लाट उसळली आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाई
व्हावी, या मागणीसाठी ग्रामस्थ व नातेवाईकांनी पुणे ग्रामीणचे पोलीस
अधीक्षक संदीप गिल यांची भेट घेतली.
या वेळी संतप्त ग्रामस्थांनी
आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण
करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे आणि खटला वेगाने चालवून आरोपीला
कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली. ग्रामस्थांच्या मागणीची
दखल घेत एसपी संदीप गिल यांनी या प्रकरणात कोणतीही दिरंगाई केली जाणार
नसल्याचे स्पष्ट केले. येत्या १५ दिवसांत न्यायालयात चार्जशीट दाखल
करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच खटला जलदगतीने चालवून आरोपीला कठोर
शिक्षा मिळावी, यासाठी न्यायालयाकडे विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी
सांगितले.
बंद पोलीस चौकीचा मुद्दाही ऐरणीवर
या
घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपळवंडीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही
ग्रामस्थांनी एसपींसमोर मांडला. गावातील पोलीस आऊटपोस्ट गेल्या ८ ते १०
वर्षांपासून बंद असल्याने पोलिसांची नियमित उपस्थिती नसल्याचा मुद्दा
नागरिकांनी उपस्थित केला. गावात अवैध दारूविक्रीसह इतर अवैध व्यवसाय सुरू
असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेवर
परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर एसपी गिल यांनी बंद पोलीस
आऊटपोस्ट आणि अवैध धंद्यांबाबत योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई
केली जाईल, असे आश्वासन दिले.