बिहारच्या अशोकधाम मंदिरात मोठी दुर्घटना; भर गर्दीत विजेची तार पडली, ७ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

बिहारच्या अशोकधाम मंदिरात मोठी दुर्घटना; भर गर्दीत विजेची तार पडली, ७ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

 


बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात सकाळीच एक मोठी दुर्घटना घडली. श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाला जल अर्पण करण्यासाठी या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती. या गर्दीत अचानक विजेची तार पडल्याने उपस्थित भाविकांना वीजेचा जोरदार झटका बसला. शॉक लागण्याची घटना घडताच लोकांनी पळापळ करण्यास सुरुवात केली आणि मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटने सात भाविकांचा मृत्यू झाला आणि डझनहून अधिक जण जखमी झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती. जलाभिषेकासाठी जवळपास ५०,००० भाविक रांगेत उभे होते. विजेची तार पडल्याने घाबरलेल्या लोकांनी सैरावैरा पळ काढला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. गर्दीत चिरडून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तात्काळ लखीसराय सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.