भरधाव कार दुभाजकावर आदळली, पलटी झाल्यानंतर ट्रकला धडकली; पुणे जिल्ह्यातील चार तरुण ठार

भरधाव कार दुभाजकावर आदळली, पलटी झाल्यानंतर ट्रकला धडकली; पुणे जिल्ह्यातील चार तरुण ठार

 


पुणे: पावसाळी पर्यटनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर कार तीन-चार वेळा उलटली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला कारने धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाला. पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ गावाजवळ ही घटना घडली. यात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन तरुण जखमी झाले आहेत.     

पर्यटनासाठी महाबळेश्वरला निघालेल्या तरुणांच्या कारचा अपघात झाला. खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजकाला धडकून तीन ते चार वेळा पलटी झाली. समोरून येणाऱ्या मालट्रकचीही कारला धडक बसली. यात पुणे जिल्ह्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

मृत्यू झालेल्या तरुणांची नावे काय?

या भीषण अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे (वय १९ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकुर (वय १९, रा.कामशेत ता. मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे, ता.मावळ), निखील बाळू राऊत (वय २० वर्ष, रा. कामशेत ता.मावळ) या तरुणांचा मृत्यू झाला आहे. 

दीक्षित दयानंद पुजारी (वय २० वर्षे, रा.कामशेत ता.मावळ), कारचालक मयुर हनुमंत शिंदे (वय 20,रा.बऊर,कामशेत ता.मावळ) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

कारचा चक्काचूर, मृतदेह अडकले 

११ ऑगस्टच्या रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये कार (एमएच 14 एलजे 3033) व मालट्रक (केए 27 सी 5878) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भीषण अपघातात कारचा चक्काचुर झाला. मृतदेह कारमध्ये अडकले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे, शिरवळ पोलीस निरीक्षक महेश इंगळे,सारोळा महामार्ग मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत पडळकर यांनी पोलीस अधिकारी,कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टिमसह धाव घेतली.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना तीन तासांहून जास्त वेळ लागला. शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कारचालकाविरोधात गुन्हा दाखल 

गंभीर जखमींवर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी मालट्रकचालक शिवकुमार देवांगत (वय 36, रा.कुप्पेलुर जि. हावेरी, कर्नाटक) याने दिलेल्या फिर्यादीवरुन कारचालक मयुर हनुमंत शिंदे याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.