सीएनजी-पीएनजी-गॅस दरवाढ, रिक्षा-टॅक्सी प्रवास महाग; दूध दरातही उसळी, आजपासून सगळं लागू
मुंबईतील रहिवाशांना १ सप्टेंबर २०२६ पासून धक्का बसणार आहे. महानगर गॅस कंपनीने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात वाढ केली आहे, तर दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅसने सीएनजी दरात प्रति किलो २ रुपयांनी आणि घरगुती पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी दरात प्रति एससीएम १ रुपयांनी वाढ केली आहे. हे दोन्ही बदल १ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. सीएनजीचा दर वाढल्याने मुंबईतील रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी वाहनधारकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे. त्याचबरोबर पीएनजी दरवाढीमुळे पाइप गॅस वापरणाऱ्या कुटुंबांच्या खर्चातही वाढ होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सी प्रवास महागला
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून, १ सप्टेंबरपासून सुधारित दर लागू होणार आहेत. त्यानुसार टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये, तर ऑटो रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये होणार आहे. त्यामुळे आजपासून प्रवास महागणार आहे. मात्र जे रिक्षा, टॅक्सी परवानाधारक सुधारित भाडेदरानुसार भाडेमीटरचे कॅलिब्रेशन करून घेतील त्यांनाच नव्या दराने भाडे आकारता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात ४,५०,००० पेक्षा जास्त ऑटो-रिक्षा आणि ५०,००० हून अधिक काळ्या-पिवळ्या टॅक्सी कार्यरत आहेत. यापैकी बहुतेक सीएनजीवर चालतात.
प्रवाशांच्या मासिक खर्चावर भार
सध्या टॅक्सीचा पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान दर ३१ रुपये आहे. नव्या दरानुसार तो ३३ रुपये करण्यात आला आहे. तर रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये करण्यात आले आहे. ही वाढ पहिल्या १.५ किलोमीटरच्या प्रवासासाठी लागू असेल. रिक्षाचा सध्याचा प्रतिकिलोमीटर दर १७.१४ रुपये असून, नव्या दरानुसार तो १८.२२ रुपये होणार आहे. या भाडेवाढीचा परिणाम दररोज रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मासिक खर्चावर होणार आहे. नवीन भाडेदर मंजूर झाले असले तरी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना तत्काळ वाढीव भाडे आकारता येणार नाही. फेब्रुवारी २०२५ मध्ये रिक्षा आणि टॅक्सी दरात वाढ करण्यात आली होती, म्हणजेच जवळपास १८ महिन्यांनंतर पुन्हा भाडेवाढ करण्यात आली आहे.
१३ लाख सीएनजी ग्राहक, ३० लाख घरगुती ग्राहकांना फटका
महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ जाहीर केली. त्यामुळे १ सप्टेंबरपासून मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीचा दर ८८ रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर घरगुती पाइप नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरातही १ रुपया प्रति घनमीटर (एससीएम) वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. कंपनीने या दरवाढीचे कारण पश्चिम आशियातील सध्याचा तणाव असल्याचे सांगितले. या दरवाढीचा परिणाम मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, लातूर आणि धाराशिव, तसेच कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि दावणगेरे येथे राहणाऱ्या अंदाजे १३ लाख सीएनजी वाहन मालकांवर होईल. या सर्व भागांतील वाहने एमजीएलच्या नेटवर्कमधून गॅस घेतात. तर अंदाजे ३० लाख घरगुती पीएनजी ग्राहकांना आता प्रति एससीएम १ रुपया अधिक द्यावा लागेल. काही दिवसांपूर्वीच दिल्ली आणि आसपासच्या भागांना गॅस पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅसनेही सीएनजीचे दर प्रति किलो ३.८९ रुपयांनी वाढवून ८६.९८ रुपये प्रति किलो केले होते.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा धक्का
एलपीजी गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ९.५० रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ५ किलो आणि १० किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आलेली नाही. दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत ₹९.५० ने वाढून आता ₹२,७४७.५० झाली आहे. मुंबईत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर ₹२,७०१ ला उपलब्ध आहे. कोलकातामध्ये १९ किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत ₹२,८७२.५० वरून ₹२,९८२ झाली आहे. ही देखील ₹९.५० ची वाढ आहे.
दरम्यान, दुधाच्या घाऊक दरातही प्रति लिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशननं दुभत्या जनावरांच्या आणि त्यांच्या चाऱ्याच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन दुधाचे घाऊक दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचा घाऊक दर ९३ रुपये प्रति लिटरवरून वाढून १०२ रुपये प्रति लिटर होईल. नवीन दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहतील. दूध उत्पादनाचा खर्च वाढला असून डेअरी शेतकऱ्यांवरील आर्थिक दबाव वाढत आहे.