गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्सचा वापर केल्यास कारवाई; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्सचा वापर केल्यास कारवाई; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवात लेझर लाईट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे आढळून आले आहे. या लाईट्समुळे नागरिकांच्या डोळ्यांना प्रचंड त्रास झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काहींच्या डोळ्यांना इजा झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. पोलिसांनाही या लेझर लाईटसचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध लागू केले आहेत.

जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेचा व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास जिल्हाधिकारी यांनी निर्बंध लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करून गणपती विसर्जनाचे मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना आढळून आल्यास अशा व्यक्ती, संस्था, मंडळे यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

लेझर लाईटसमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम 

१) डोळ्यांवर होणारे गंभीर परिणाम

रेटिनाला इजा : लेझर किरण थेट डोळ्यात गेल्यास रेटिनाच्या पेशी जळू शकतात, ज्यामुळे डोळ्यांची पाहण्याची क्षमता कायमची कमी होऊ शकते.

दृष्टी जाण्याचा धोका : तीव्र क्षमतेचा लेझर काही सेकंद जरी डोळ्यांवर पडला, तरी कायमचे किंवा तात्पुरते अंधत्व येऊ शकते.

फ्लॅश ब्लाइंडनेस : अचानक तीव्र प्रकाश डोळ्यांवर पडल्याने काही काळासाठी काहीही दिसत नाही, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो.

डोळ्यांची जळजळ व पाणी येणे: तीव्र प्रकाशाच्या संपर्कामुळे डोळे लाल होणे, दुखणे आणि सतत पाणी येणे यांसारखे त्रास होतात.

२. त्वचेवर होणारे दुष्परिणाम

त्वचा जळणे (Skin Burns): अति तीव्र, औद्योगिक किंवा स्टेज लेझर थेट त्वचेवर पडल्यास त्वचा भाजणे किंवा लाल होणे असा त्रास होऊ शकतो.

खाज व अ‍ॅलर्जी: संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना लेझरच्या उष्णतेमुळे रॅश किंवा खाज सुटू शकते.

३ . कॅमेऱ्याच्या सेन्सरचे नुकसान (इतर प्रभाव)

आरोग्याव्यतिरिक्त, लेझर लाईट मोबाईल किंवा प्रोफेशनल कॅमेऱ्याच्या लेन्सवर पडल्यास त्याचा कॅमेरा सेन्सर कायमचा खराब होतो.