"धनुष्यबाण गोठवण्याची मागणी म्हणजे बाळासाहेबांचे विचार पुसण्याचा प्रयत्न"; सुनावणीपूर्वी शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरुन सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ वाजेनंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी पार पडणार असून, शिंदे गटाकडून आजपासून न्यायालयात बाजू मांडण्यास सुरुवात होणार आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली. धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी करणे दुःखद असून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचे म्हटले.
गेल्या काही दिवसांत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची आक्रमक मागणी केली होती. ठाकरे गटाच्या या आक्षेपानंतर आता शिंदे गट प्रतिउत्तर देणार आहे. शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल आजपासून युक्तिवाद करणार आहेत.
उपमुख्यमंत्र्यांची कायदेतज्ज्ञांशी खलबते
ठाकरे गटाच्या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि शिंदे गटाची संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख वकिलांशी आणि कायदेतज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केल्याचे म्हटलं जात आहे. सर्व पुरावे आणि तांत्रिक बाजू न्यायालयासमोर स्पष्टपणे मांडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
धनुष्यबाण गोठवण्याची मागणी म्हणजे हिंदुत्वाचा अपमान – एकनाथ शिंदे
दुसरीकडे, ठाकरे गटाने चिन्ह गोठवण्याची मागणी केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संताप व्यक्त केला. “ धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी करणे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. धनुष्यबाण हे केवळ एक निवडणूक चिन्ह नसून, ते आमचे श्रद्धेचे स्थान आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे प्रतीक आहे. हे चिन्ह गोठवण्याची मागणी करणे म्हणजे बाळासाहेबांची विचारसरणी पुसून टाकण्याचा, हिंदुत्व आणि महाराष्ट्रातील जनतेचा कौल गोठवण्याचाच प्रयत्न आहे. विरोधकांची ही मागणी अत्यंत दुर्दैवी असून, याने लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. २०१९ मध्ये ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून कौल नाकारला, तेच आज पुन्हा या अस्मितेवर वार करत आहेत,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, आज दुपारी २ नंतर सुरू होणाऱ्या या सुनावणीत मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादातून शिंदे गट न्यायालयासमोर काय नवी तथ्ये मांडतात, याकडे संपूर्ण देशाचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.