...तर सत्तेतून बाहेर पडू, शिंदेसेनेचा इशारा; मुंबई महापालिकेतील राजकारण तापलं, नेमकं काय घडलं?

...तर सत्तेतून बाहेर पडू, शिंदेसेनेचा इशारा; मुंबई महापालिकेतील राजकारण तापलं, नेमकं काय घडलं?

 


मुंबई: अभय योजनेतील भ्रष्टाचारावर आक्रमक पवित्रा घेत शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी जोवर या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोवर स्थायी समितीच्या बैठकीत भाग घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. इतकेच नाही तर सभात्याग करून आम्ही सत्तेला लाथ मारू असाही इशारा घोले यांनी दिला आहे.

अमेय घोले म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शासनाने २ वर्षापूर्वी अभय योजना आणली होती. त्यात जे झोपडीधारक आहेत त्यांना पात्रता करून देण्यात येत होती. मात्र या योजनेत अक्षरश: धंदा मांडला आहे. काही अधिकारी ५ ते १० लाख लोकांकडून वसूल करत आहेत. हे आम्ही उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. हा जो काही घोटाळा आहे तो आम्ही सहन करणार नाही. त्यापेक्षा आम्ही सभात्याग करू. सत्तेवर लाथ मारू पण गोरगरिबांना आम्ही न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही स्थायी समितीचा भाग होणार नाही असं त्यांनी सांगितले.

वाद मिटवण्यात समन्वय समिती अयशस्वी

सत्ताधारी भाजपा-शिंदेसेना नगरसेवकांच्या वाद मिटवण्यात समन्वय समिती अयशस्वी ठरली आहे. समितीच्या बैठकीनंतरही सभात्यागाचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही मित्रपक्षातील वाद सोडवण्यासाठी समन्वय समितीची बैठक झाली. परंतु समन्वय समिती बैठकीनंतरही दोन्ही पक्षातील नाराजी कायम आहे. नुकतेच सुधार समितीच्या बैठकीतून भाजपा नगरसेवकांनी वॉकआऊट केले होते. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीतून शिंदेसेनेने सभात्याग केला. फेब्रुवारी महिन्यात महायुतीची सत्ता मुंबई महापालिकेत आली परंतु गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षातील मतभेद वारंवार समोर येत आहेत. 

महापौरांची भूमिका काय?

दरम्यान, सत्तेतून बाहेर पडू अशी कुठलीही भाषा भाजपा-शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी वापरली नाही. काही विषय प्रत्येकाला मांडायचे असतात. अमेय घोले यांनी जो काही विषय मांडला तो प्रशासनावर मांडला आहे. भाजपावर त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. कुठेही भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात मतभेद नाहीत. सगळे एकोप्याने सुरू आहे असं महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे.

भूखंड आरक्षण, लाचखोरी; भाजप-शिंदेसेनेत मतभेद

जोगेश्वरी पूर्वेतील मजास गावातील पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठी आरक्षित भूखंडाचे आरक्षण रद्द करून तो निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व शिंदेसेनेत मतभेद होऊन भाजपा सदस्यांनी बुधवारी सुधार समितीत सभात्याग केला होता. त्यानंतर एफ/उत्तर विभागातील एसआरएच्या अभय योजनेतील लाभार्थ्यांकडून कथित अधिकारी लाखो रुपयांची मागणी करीत असून त्यावर प्रशासनाने कारवाई न केल्याने शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला.