तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! सांगलीवरून आलेले ५०० लिटर भेसळयुक्त दूध एफडीए कडून जप्त; डेअरींमध्ये पुरवठ्याचा डाव उधळला

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! सांगलीवरून आलेले ५०० लिटर भेसळयुक्त दूध एफडीए कडून जप्त; डेअरींमध्ये पुरवठ्याचा डाव उधळला

 


डोंबिवली: मागील अनेक दिवसांपासून राज्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळ विरोधात मोठा कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आज कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. डोंबिवली पश्चिमेतील भोईरवाडी परिसरात टाकलेल्या छाप्यात सांगलीहून आणलेले ५०० लिटर भेसळयुक्त सुटे दूध जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले. ऐन सणासुदीच्या आणि दैनंदिन वापराच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाचा साठा पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईरवाडी भागात संशयास्पदरीत्या मोठ्या प्रमाणावर सुट्या दुधाची आवक झाल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून तपासणी केली असता, दूध विक्री करणाऱ्या संबंधित व्यक्तीकडे अन्न सुरक्षा मानकांनुसार कोणताही अधिकृत विक्री परवाना आढळून आला नाही. इतकेच नव्हे, तर हे दूध कुठून खरेदी केले याचे कोणतेही वैध बिलही संबंधितांकडे उपलब्ध नव्हते. चौकशीदरम्यान हे ५०० लिटर भेसळयुक्त दूध कल्याण आणि डोंबिवली परिसरातील अनेक स्थानिक डेअरींमध्ये विक्रीसाठी वितरित केले जाणार असल्याचे उघड झाले आहे.

संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत

अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळावरून दुधाचे अधिकृत नमुने ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेत रासायनिक तपासणीसाठी पाठवले आहेत. भेसळयुक्त दुधाचा उर्वरित साठा नागरिकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तो त्वरित नष्ट करण्यात आला. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या दूध विक्रेत्याविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये पुढील कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.