सरसकट दुष्काळ जाहीर करा  ​ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांची मागणी

सरसकट दुष्काळ जाहीर करा ​ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांची मागणी

 

मुंबई: राज्य सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, उर्वरित तालुक्यांमध्येही परिस्थिती गंभीर असल्याने राज्यातील सर्व तालुक्यांत सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. दुष्काळाच्या प्रश्नावर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि दुष्काळी मदत दिवाळीपूर्वी वितरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.  

     खा.शरद ​पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांसाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. संपूर्ण जमीन महसूल माफ करावा, शेतीशी संबंधित कर्जे माफ करावीत, कृषी पंपांची वीजबिले माफ करावीत,तसेच दुष्काळ ग्रस्त भागात वीजपुरवठा खंडित करू नये,अशी मागणी त्यांनी केली.  

      सरकारने ​रोजगार हमी योजनेचे निकष शिथिल करून मागेल त्या ठिकाणी तीन किलोमीटरच्या परिसरात रोजगाराची कामे सुरू करावीत.पिण्याचे आणि जनावरांच्या पाण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत. शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो धान्य मोफत द्यावे, पशुधनासाठी थेट खात्यात अनुदान जमा करावे, असे पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.  

 दुष्काळामुळे केळी,ऊस फळबागा आणि धानाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, तसेच वसतिगृह आणि खानावळ शुल्क माफ करावे, असे त्यांनी म्हटले आहे.  

      ​दरम्यान, ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होत असल्याने पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या चारा-पाण्याचे तातडीने नियोजन करण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले. पक्षाचे आमदार आणि खासदार दुष्काळ निवारणासाठी एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.