बारामती पोलिस  वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत  राहणार सज्ज

बारामती पोलिस वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत राहणार सज्ज

 

'सीपीआर', 'बीएलएस' चे प्रशिक्षण

​बारामती :- नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या बारामती शहर पोलिसांना आतां वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ही तातडीने जीवनरक्षक मदत करता यावी, यासाठी सीपीआर व बीएलएस (बेसिक लाईफ सपोर्ट) चे प्रशिक्षण देण्यात आले. वैद्यकीय व्यावसायिकांची निमा व इंडियन डेन्टल असोसिएशन (आयडीए) च्या बारामती-फलटण शाखेच्या डॉक्टरांच्या टीमने सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविला.

   ​हा उपक्रम पो.अधिक्षक संदीपसिंह गिल,अपर पो. अधिक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला.

    ​अपघात,गर्दी,मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम किंवा अन्य आपत्कालीन घटनांच्या ठिकाणी पोलिस हे अनेकदा सर्वप्रथम पोहोचणाऱ्या यंत्रणांपैकी एक असतात. एखाद्या व्यक्तीला अचानक कार्डियाक अरेस्ट आल्यास किंवा श्वासोच्छ्वास बंद झाल्यास वैद्यकीय मदत मिळेपर्यंतची सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत निर्णायक ठरतात. अशा वेळी योग्य पद्धतीने सीपीआर देण्याचे ज्ञान जीव वाचविण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.प्रशिक्षणा दरम्यान डॉक्टरांच्या टीमने पोलिसांना मार्गदर्शन केले.

​गणेशोत्सव, मिरवणुकांमध्ये ठरणार उपयुक्त

  ​गणेशोत्सव,पालखी सोहळे, मिरवणुका, बंदोबस्त तसेच मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये हजारो नागरिक सहभागी होतात. अशा वेळी एखाद्या नागरिकाला अचानक हृदयविकाराचा त्रास, श्वासोच्छ्वासाची गंभीर समस्या उद्भवल्यास घटनास्थळी असलेले प्रशिक्षित पोलिस कर्मचारी प्रथम प्रतिसादक म्हणून तातडीची मदत करू शकतील.हा उपक्रम पोलिस ठाण्यापुरता मर्यादित न ठेवता मार्केट परिसर,शाळा, एस.टी.स्टँड,महाविद्यालये आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी सीपीआर व प्राथमिक जीवनरक्षक प्रशिक्षण देण्या बाबत डॉक्टरांच्या टीमशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.