९ वर्षीय चिमुकल्याच्या अवयवदानातून चौघांना जीवनदान; शेतकरी कुटुंबाचा धाडसी निर्णय
मुलाचे हृदय चेन्नईतील तीन वर्षीय बालरुग्णाला, यकृत पुण्यातील एका रुग्णाला, तर दोन्ही मूत्रपिंडे पुण्यातीलच दोन रुग्णांना दान करण्यात आली. या अवयवदानातून एकूण चार रुग्णांना नवजीवन मिळाले. मुलावर डॉ. प्रसन्न कासेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. मेंदूमृत घोषित केल्यानंतर पालकांनी अवयवदानास संमती दिली. अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. पल्लवी मेहता, डॉ. वीरेश नाष्टे, डॉ. संतोष गुजर, डॉ. शरद जाधव आणि प्रत्यारोपण समन्वयक डॉ. संदीप पाटील यांच्या पथकाने पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
मुलाचे हृदय त्याच रक्तगटाचा योग्य प्राप्तकर्ता सोलापुरात उपलब्ध नसल्याने ते अन्य ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. अवयव प्रत्यारोपण पुणे विभागाच्या समन्वयक आरती गोखले यांनी हृदय उपलब्ध असल्याची सूचना आंतरराष्ट्रीय स्तरावर जारी केली. त्यानंतर एमजीएम हॉस्पिटल, चेन्नईमध्ये उपचार घेत असलेल्या तीन वर्षीय रशियन बालरुग्णासाठी हृदयाची निवड झाली.
"हृदय प्रत्यारोपणासाठी वेळ अत्यंत महत्त्वाचा असल्याने चेन्नईची वैद्यकीय टीम चार्टर विमानाने सोलापूरला पोहोचली. हृदय प्रत्यारोपणासाठी साधारण चार ते सहा तासांचा कालावधी महत्त्वाचा असतो. त्यामुळे सोलापूर ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली. प्रतिकूल हवामानामुळे विमान उड्डाण केल्यानंतर पुन्हा धावपट्टीवर परतावे लागले. त्यामुळे काही वेळ गेला; मात्र वैद्यकीय पथकाने प्रक्रिया वेगाने पूर्ण करून हृदय चेन्नईला पोहोचवले."
- डॉ. पल्लवी मेहता, अतिदक्षता विभाग प्रमुख.