'...मग एकनाथ शिंदेंना कळेल", आदित्य ठाकरे संतापले, पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट; पोलीस ठाण्याबाहेर गर्दी वाढली

'...मग एकनाथ शिंदेंना कळेल", आदित्य ठाकरे संतापले, पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट; पोलीस ठाण्याबाहेर गर्दी वाढली

 

ठाणे: उद्धवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर बुधवारी दिवसभर  ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले. पूर्णेकर यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि समर्थकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेरच आंदोलन सुरू केले. रात्री उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे कुटुंबीयांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी आमच्या दादाला न्याय पाहिजे, असा आक्रोश पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी केला. त्यावर न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असे आदित्य ठाकरे त्यांना म्हणाले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. 

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यातील राजकारण ढवळून निघाले. मंगळवारी (२९ सप्टेंबर) रात्री पूर्णेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात थेट मिनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. 

आदित्य ठाकरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट

रात्री सात वाजता आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे त्यांनी ठाण्याबाहेर आंदोलन करत असलेल्या पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची भेट घेतली.

'आमच्या दादाला न्याय पाहिजे', असे म्हणत पूर्णेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आदित्य ठाकरेंसमोर हात जोडले. त्यावर न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

ज्यांच्यावर आरोप, त्यांनाच पोलीस संरक्षण

कुटुंबीयांनी आदित्य ठाकरेंना सांगितले की, पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहेत. त्यांनाच पोलिसांनी आधीच संरक्षण दिलेले आहे. त्यातील एका आरोपीने तर कबूल केले आहे की, त्यानेच ही हत्या केली आहे, तरीही त्याला अटक करण्यात आलेली नाही.

कुटुंबीयांनी सांगितले की, प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचा कट गणेशोत्सवापासून सुरू होता. आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आम्ही हात मोकळे  सोडले, मग एकनाथ शिंदेंना कळेल.'

अखेर मृतदेह पोलीस ठाण्यात घेतला

सुरूवातीला पोलिसांनी मृतदेह पोलीस ठाण्याच्या इमारतीत नेण्यास विरोध केला होता. पण, गर्दी वाढत गेली. लोकांच्या घोषणा वाढत गेल्या. त्यानंतर पोलिसांनी लोकांना शांत करण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्याच्या इमारतीत आणण्यास परवानगी दिली. तेव्हापासून हा मृतदेह तिथेच ठेवण्यात आला आहे.