माजी नगरसेवकावर ३०-४० लोकांसमोर कोयत्याने हल्ला, अचानक आला आणि सपासप वार; आरोपी कोण?

माजी नगरसेवकावर ३०-४० लोकांसमोर कोयत्याने हल्ला, अचानक आला आणि सपासप वार; आरोपी कोण?

 


सोलापूर: सोलापूरमध्ये एका माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. आजूबाजूला ३० ते ४० लोक असताना भररस्त्यावरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली. हल्ला करतानाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून, त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

सिंधी समाज संघटनेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक लालचंद वाधवानी (वय ८६) हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

अचानक आला आणि कोयत्याने वार

सोलापूर शहरातील गुरु नानक चौकातील सिंधी कॉलनीमध्ये  गुरुवारी (३ सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली. व्हिडीओमध्ये आरोपी वाधवानी यांच्याजवळ येताच अचानक कोयता काढतो आणि त्यांच्यावर वार करतो. जखमी झालेले वाधवानी खाली कोसळतात.   

वाधवानी यांच्यावर हल्लेखोर नातेवाईकच

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव प्रकाश किसनदास आडवाणी (वय ६५) असे आहे. प्रकाश आडवाणी हा वाधवानी यांच्या भाचीचा पती घटस्फोटित पती आहे. सदर बाजार पोलिसांनी त्याला अटक केली. 

राख सावडण्याच्या कार्यक्रमातच हल्ला

सिंधी कॉलनीमध्ये मृत व्यक्तीच्या तिसराचा कार्यक्रम होता. त्यामुळे लोक तिथे आले होते. वाधवानीही तिथे आले. इतर लोकांशी बोलत असतानाच आडवाणी आला आणि त्याने कोयता काढला. ते बघून लोक बाजूला झाले. त्यानंतर त्याने वाधवानी यांच्यावर दोन वार केले. 

घटस्फोटाच्या कारणातून हल्ला

प्रकाश आडवाणी याचे लालचंद वाधवानी यांच्या भाचीसोबत लग्न झाले होते. लालचंद यांनीच हे लग्न जुळवले होते. पण, नंतर त्यांचा घटस्फोट झाला. २५ वर्षापूर्वी हे घडले. पण, घटस्फोटाला लालचंद वाधवानीच जबाबदार असल्याचे प्रकाश आडवाणीचे मत होते आणि याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने हल्ला केल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले.