'त्या बालबुद्धीला महत्त्व द्यायचे की...'; फडणवीसांनी अमित ठाकरेंबद्दल सोडलं मौन, कृष्णराज महाडिकांच्या आंदोलनाबद्दल काय बोलले?
अमित ठाकरे यांनी एका महाविद्यालयात जाऊन पंतप्रधानांचा फोटो काढला. भाजपाला नक्की किती राग आला, हे कळत नाहीये. कारण कृष्णराज महाडिकांनी एक आंदोलन केले. मग महाडिकांवर रविंद्र चव्हाणच रागावले. नक्की काय भूमिका आहे, तुमची स्वतःची आणि भाजपाची? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय दिले उत्तर?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पहिली गोष्ट तर अशी आहे की, आमच्यासमोर प्रश्न आहे; एखादा व्यक्ती बालबुद्धीने वागला, तर त्यावर किती प्रतिक्रिया द्यायची. म्हणजे आपण त्या बालबुद्धीला महत्त्व द्यायचे की आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे? याच कदाचित असमंजस्यामध्ये आम्ही होतो."
लोकांना लक्षात आले की, ते किती बालबुद्धी आहेत
"आमच्यातील तरुणांनी राग प्रकट केला. आमच्यातील जे प्रगल्भ आहेत, त्यांचं मत असं होतं की, लोकांनाच या गोष्टी आवडत नाहीत. बालबुद्धीने वागलेल्या. यातून एक प्रकारे त्यांच्याचबद्दल लोकांचं मत खराब होतं किंवा लोकांना लक्षात येतं की, हे किती बालबुद्धी आहेत. त्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त यावर आपण प्रतिक्रिया देऊ नये. कारण त्यांनी ते प्रसिद्धीसाठीच केले. दुसरे काही कारण नव्हते", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे वागणे अतिशय मुर्खासारखं आहे
"आमच्या नवनाथ बनने तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या (मनसे) कार्यालयातील फोटो शेअर केला. त्यामध्ये महाराजांचा फोटो तर अशा ठिकाणी होता आणि अशा लोकांमध्ये तो लावलेला होता की, त्यांना लाज वाटली पाहिजे. पण, ते जाऊद्या. तो प्रश्न नाहीये. प्रश्न इतकाच आहे की, यासंदर्भात प्रतिक्रिया देऊन त्यांना जी प्रसिद्धी पाहिजे. माझे मते असे आहे की, अतिशय मुर्खासारखं हे वागणं आहे, त्यापलीकडे मी काही बोलणार नाही", अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी अमित ठाकरेंवर निशाणा साधला.