अभिजीत दीपके घेणार मनोज जरांगे पाटील यांची भेट? मराठा आंदोलनाला बळ, नव्या समीकरणाची नांदी!
मराठाआरक्षणाच्या हक्काच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता तेरा दिवस झाले आहेत. एकीकडे सरकारने शिष्टमंडळ न पाठवण्याची भूमिका घेतली असून, मनोज जरांगे यांनीही आता आंदोलनाची आरपारची दिशा जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. यातच आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नीट परीक्षेतील अनियमिततेच्या मुद्द्यावरून अभिजीत दीपके यांनी दिल्तीलील जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत जाऊन अभिजित दीपके यांची भेट घेतली होती आणि आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यानंतर आता अभिजित दीपके आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे समजते.
अभिजीत दीपके घेणार मनोज जरांगे पाटील यांची भेट?
अभिजीत दीपके आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. शुक्रवारी दुपारी अभिजीत दीपके आंतरवाली सराटीत जाणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या भेटीमुळे मराठाआरक्षण आंदोलनाला आणखी बळ मिळणार असून, ही नव्या समीकरणाची नांदी ठरू शकते, असे म्हटले जात आहे. या भेटीनंतर अभिजीत दीपके माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सरकारने शिष्टमंडळ पाठवायचे असेल तर पाठवावे, मी कोणाचीही वाट पाहत बसलेलो नाही. आम्ही ठरवल्याप्रमाणे मुंबईत जाणारच असून १२ सप्टेंबरला आंदोलनाची पुढील आरपारची दिशा जाहीर करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तर दुसरीकडे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कायदेशीर नियमांचे पालन करणे आणि वंशावळ सिद्ध करणे बंधनकारक असून, योग्य त्या पुराव्यांशिवाय कुणालाही दाखले दिले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी म्हटले आहे.