वित्त खात्यासाठी अजित पवार गट घेणार अमित शाह, मुख्यमंत्र्यांची भेट

वित्त खात्यासाठी अजित पवार गट घेणार अमित शाह, मुख्यमंत्र्यांची भेट

 

मुंबई : सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार अजित पवार गटाला देण्यात आलेले वित्त आणि आपत्ती व्यवस्थापन ही खाती पुन्हा मिळविण्यासाठी पक्षाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी देवगिरी या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीला राष्ट्रीय कार्यध्यक्ष प्रफुल्ल पटेल, युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्या व्यतिरिक्त सर्वच नेते उपस्थित होते.

पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षाकडे असलेले वित्त खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत देण्याच्या बोलीवर स्वतःकडे घेतले होते. मात्र आता अजित पवार यांच्या निधनाला आठ महिने पूर्ण होऊनही वित्त खाते परत मिळाले नसल्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

पक्षाच्या वाट्याला आलेली ही खाती परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक झाला असून कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. ही खाती परत मिळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन खात्यांची मागणी करण्याचे ठरविण्यात आले. 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबतीत तसेच २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी ५० विधानसभा मतदारसंघांच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.