महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात प्रभावी पावसाची शक्यता नसून, पुढील आठवडाही बहुतांश महाराष्ट्रासाठी कोरडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज (८ सप्टेंबर) नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मात्र, उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळता मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये राज्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला. ऑगस्टमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. आता सप्टेंबरमध्येही पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात मान्सूनचे वारे कमकुवत झाले आहेत. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असून, महाराष्ट्रावर सध्या कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
एल निनोचा वाढता प्रभाव
यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचे संकट असल्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. आता एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील पावसाची तूट वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे.
हवामान प्रणाली कुठे सक्रिय?
देहरी, पुरुलिया, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण गुजरातपासून कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच तेलंगणापासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
मध्य उत्तर प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानातील श्रीगंगानगर, नरनौल आणि कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रातून पुढे जात आहे.