राज्यात १०० टक्के डीजे बंदी हवी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं विधान; भाजपात पडले २ गट?

राज्यात १०० टक्के डीजे बंदी हवी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं विधान; भाजपात पडले २ गट?

 


पुणे : बऱ्याच दिवसापासून राज्यात डीजे बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांनी डीजेवरील बंदीची मागणी उचलून धरली त्यानंतर या मुद्द्यांवरून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. त्यात राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडत १०० टक्के डीजेवर बंदी आणली पाहिजे असं विधान केले आहे. त्यामुळे डीजे बंदीवरून भाजपातच २ गट पडल्याचे चित्र समोर येत आहे.

सामाजिक न्याय आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्राचा पारंपारिक उत्सव आहे आणि ते पारंपारिक पद्धतीनेच साजरे केले पाहिजेत. डीजे वाजवण्याला आमचा १०० टक्के विरोध आहे. कर्णकर्कश आवाजाने लोकांना होणारा त्रास आणि ध्वनीप्रदुषणामुळे अशाप्रकारे उत्सव साजरे व्हायला नको. पारंपारिक वाद्य वाजवून आपले उत्सव साजरे करायला हवेत. उत्सव साजरा करताना लोकांना त्रास होईल अशा कर्णकर्कश आवाजात डीजे लावून त्याचा नागरिकांना, विद्यार्थ्यांना, वृ्द्धांना त्रास होईल असे उत्सव साजरे करायला नको असं त्यांनी म्हटलं.

तसेच उत्सव साजरा करताना पारंपारिक वाद्य वापरले पाहिजे. आमची भूमिका डीजेच्या विरोधात आहे. पण लोकशाहीत काही जण आपली मते मांडताना गणेशोत्सव बंद करावा असं म्हणतात, पण ही महाराष्ट्राची परंपरा असलेला गणेशोत्सव सण बंद करणे हा यावरचा मार्ग नाही. गणेशोत्सव असो वा इतर कुठल्याही सण उत्सवात स्पीकरच्या भिंती डीजे लावू नयेत. अतिशय चांगल्या पद्धतीने पुण्यातील ३२ मंडळांनी डीजे न लावला दहीहंडी साजरी केली. पारंपारिक वाद्ये वाजवली आणि उत्साहात हा सण साजरा केला असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

दरम्यान, पुणेकर नेहमीच महाराष्ट्राला दिशा देतात. तशी दिशा या गणपती उत्सवातून आम्ही पुणेकर निश्चित देऊ. डीजेला आमचा विरोध आहे. डीजे बंदी ही झालीच पाहिजे. वर्षभरात जितके उत्सव साजरे होतात, ते कोणत्याही धर्माचे असोत त्यांनाही डीजे बंदी लागू असावी. हा नियम सर्वांना एकाच प्रकारे लागू झाला पाहिजे अशी मागणीही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे.

पुण्यात नागरिकांचा मोर्चा

दहीहंडी उत्सवात डीजे व कर्णकर्कश लाऊडस्पीकरवर नियंत्रण ठेवण्यात पोलिस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवासह सर्वच धार्मिक, जातीय आणि राजकीय मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषण करणाऱ्या लाऊडस्पीकरवर आणि तत्सम साधनांवर संपूर्ण बंदी आणावी अशी मागणी पुणेकरांनी केली. रविवारी लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व चौक ते महापालिका दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हा मोर्चा महापालिकेच्या इमारतीसमोर पोहोचला तेव्हा रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता नागरिक रस्त्यावर उभे राहून घोषणाबाजी करत होते. आंदोलनात ४० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांची आणि मध्यमवयीन पुणेकरांचीच संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. मात्र पुण्यातील डीजे बंदीच्या मुद्द्यावरून भाजपात वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत. त्यामुळे डीजे बंदीच्या मुद्द्यावर पक्षात २ गट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.