वाहतूक शाखा आणि नगरपरिषदेची संयुक्त जनजागृती मोहीम; गणेशोत्सवामुळे शहरातील वाहतुकीवर ताण; बेशिस्त पार्किंगविरोधात कारवाईला वेग

वाहतूक शाखा आणि नगरपरिषदेची संयुक्त जनजागृती मोहीम; गणेशोत्सवामुळे शहरातील वाहतुकीवर ताण; बेशिस्त पार्किंगविरोधात कारवाईला वेग

 

 बारामती: गणेशोत्सवामुळे बारामती शहरात गणेशोत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखा आणि बारामती नगरपरिषदेच्या वतीने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

     गणेशोत्सवाच्या काळात रहदारीला आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी गणेश भाजी मंडई येथील नगरपरिषदेच्या वाहनतळाचा पार्किंगसाठी वापर करावा, असे आवाहन नगरपरिषद व वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

     शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना रस्त्यावर वाहने उभी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १६) वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे आणि नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर शहरात ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

     विशेषतः सिनेमा रोड, स्टेशन रोड तसेच गुणवडी चौक ते गांधी चौक या मार्गावर रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. वाहनधारकांनी मुख्य रस्त्यांवर वाहने उभी न करता उपलब्ध वाहनतळाचा वापर करावा, अशा सूचना देण्यात येत आहेत.

     दरम्यान, या मोहिमेअंतर्गत बारामती बसस्थानक परिसरातही वाहतूक शाखेकडून कारवाई होत असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बसस्थानकातील अनधिकृत पार्किंग आणि वाहतुकीच्या अडथळ्यांबाबत यापूर्वीही वारंवार वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणेच बसस्थानक परिसरातही बेशिस्त पार्किंगविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.