कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपली! 'माधुरी' हत्तीण वनतारातून नांदणीकडे निघाली; पहिला व्हिडीओ आला समोर

कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपली! 'माधुरी' हत्तीण वनतारातून नांदणीकडे निघाली; पहिला व्हिडीओ आला समोर

 

कोल्हापूर: राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नांदणी मठाच्या 'महादेवी' उर्फ 'माधुरी' हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. गुजरातमधील जामनगर येथील 'वनतारा' प्रकल्पातून माधुरी हत्तीण आता पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली असून, तिचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही बातमी दिली असून, यामुळे नांदणीसह कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील ऐतिहासिक 'स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठा'चे प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती श्री १०८ शांतीसागरजी महाराज यांची ७१ वी पुण्यतिथी १७ सप्टेंबर रोजी मठात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या महत्त्वाच्या धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमासाठी माधुरी हत्तीण मठात दाखल व्हावी, अशी भाविकांची इच्छा होती. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर माधुरी हत्तीण वनतारातून नांदणी मठात येण्यासाठी निघाली आहे.

जिल्ह्यातून परत आणण्याची केली होती मागणी

माधुरी हत्तीणीला २८ जुलै रोजी उपचारांसाठी वनतारा येथे नेण्यात आले होते. त्यानंतर तिला पुन्हा नांदणी मठात सन्मानाने परत आणण्यासाठी जिल्ह्यातून मागणी सुरू होती. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांसह माजी खासदार राजू शेट्टी यांनीही प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

माधुरी हत्तीण वर्षभरानंतर पुन्हा मठात परत येत असल्यामुळे भाविक, मठाचे पदाधिकारी आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. मठाच्या धार्मिक विधींमध्ये माधुरीचे स्थान महत्त्वाचे आहे.