मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा रोखण्यास हायकोर्टाचा नकार; केवळ अंदाज, भीतीमुळे आंदोलन रोखणार कसे?

मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा रोखण्यास हायकोर्टाचा नकार; केवळ अंदाज, भीतीमुळे आंदोलन रोखणार कसे?

 


मुंबई : मागील वर्षीच्या अनुभवाच्या आधारे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या प्रस्तावित मुंबई मोर्चाला रोखता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रतिबंधात्मक आदेश देण्यास नकार दिला. केवळ अंदाज आणि संभाव्य परिस्थितीच्या भीतीवरून आंदोलनाला प्रतिबंध करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आपण लोकशाहीत असून आंदोलनाचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचेही खंडपीठाने नमूद केले.

निलेश डहाणूकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने आंदोलक अद्याप मुंबईत आलेले नसताना केवळ पूर्वानुभवाच्या आधारे आदेश कसा देता येईल, असा सवाल केला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी, असे न्यायालयाने सांगितले.

राज्याचे महाअधिवक्ता मिलिंद साठे यांनी गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असून, प्रस्तावित आंदोलनाला सरकारने परवानगी दिलेली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. परवानगीशिवाय मोर्चा काढता येणार नसल्याचेही ते म्हणाले. 

‘परवानगी द्या अथवा न द्या, मुंबईला जाणारच!’

परवानगी दिली आणि नाही दिली तरी मुंबईला जाणार, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला. मुंबईकडे कूच करण्याची तारीख, मार्ग आणि पुढील आंदोलनाची दिशा शनिवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीत निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवरायांना मानणारे विघ्न आणणार नाहीत : मुख्यमंत्री 

गणेशोत्सवात कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. या मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे कोणी असतील, ते कधीही गणपती उत्सवात विघ्न आणणार नाहीत, असे ते म्हणाले.