‘डीजे’च्या फंदात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; मुख्यमंत्र्यांचा सल्ला
पुणे : गणेशोत्सवात डीजे असावा की नसावा यावरून वाद सुरू असताना सोमवारी पुणे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पुणेकरांनी वादात पडू नये, असा सल्ला दिला आहे. सांस्कृतिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे जगाला पुणेकरांनी दाखवून द्यावे, असेही त्यांनी म्हटले.
काही पुणेकरांनी एकत्र येत गुडलक चौकात डीजे विरोधात आंदोलन केले. तर दुसरीकडे काही गणेश मंडळे व भाजप शहराध्यक्षांसह इतर नेते डीजेचे उघडपणे समर्थन करत आहेत. भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी मात्र, गणेशोत्सवासह सगळेच उत्सव डीजेमुक्त झाले पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी डीजे वादावर भाष्य केले. ते म्हणाले, “बाहेर गेल्यावर मला माध्यमांचे प्रतिनिधी विचारतील डीजे बंदीवर तुमचे मत काय आहे. पण मी सांगू इच्छितो की, पुणेकरांनी वादात पडू नये.” पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा जपण्याची क्षमता केवळ पुणेकरांमध्ये आहे. पुणेकर सुज्ञ आहेत. त्यामुळे पुणेकरच आपल्या कृतीतून सांस्कृतिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा, हे जगाला दाखवून देतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.