"पान गुटख्याची जाहिरात करताय? तर आधी स्वतः खा अन् तुमच्या...!"; तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड अभिनेत्यांवर निशाणा, स्पष्टच बोलले
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६
Edit
मुंबई : पानमसाला आणि गुटख्यांच्या अप्रत्यक्ष जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना पाठवलेल्या कायदेशीर नोटिसांचे महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी समर्थन केले. "माणसाने दोन चेहरे ठेवू नयेत. जर एखादी गोष्ट चांगली असेल, तर जाहिरातदारानेही तिचा वापर करायला हवा," असे मुंढे यांनी म्हटले आहे. FDA ने ऑगस्ट महिन्यात शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावली आहे.
एनडीटीवीच्या एका कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, "मी कुणाची चापलुसी करत नाही आणि चापलूसी सहनही होत नाही. वैयक्तिक आयुष्यात एक चेहरा आणि सार्वजनिक आयुष्यात दुसरा चेहरा ठेवणारे लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत. तुम्ही जे सांगता, जे करता त्यासंदर्भात प्रामाणिक नसाल, तर तुम्ही वास्तविक व्यक्ती नाही."
"आधी तुमच्या मुलांनाही खायला लावा" -
मुंढे पुढे म्हणाले, "तुम्ही ज्या उत्पादनाची जाहिरात करत आहात ते चांगले असेल, तर स्वतःही वापरायला सुरुवात करा. जाहिरातदाराने ते उत्पादन खाल्ले पाहिजे. तुम्ही इतरांना का फॉलो करायला सांगत आहात? स्वतःपासून सुरुवात करा. जर तुम्ही पान-गुटख्याची जाहिरात करत असाल, तर आधी स्वतः खा, तुमच्या मुलांनाही खायला लावा. त्याची सवय लावा."
"आधी आपल्या कुटुंबाला ही उत्पादने खायला सांगा" -
ते म्हणाले की, "कलाकारांनी आधी आपल्या कुटुंबाला ही उत्पादने खाण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. जर तुम्ही म्हणत असाल की त्यात केशर आहे, तर तुम्हाला ते खावेसे वाटेल, बरोबर? तर त्यांना ते खाऊ द्या. तुमच्या कुटुंबाला ते खायला सांगा. मग बाकी सर्वांना सांगा. हे केवळ अनैतिकच नाही, तर बेकायदेशीरसुद्धा आहे."
कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही -
केवळ पैसे कमवण्यासाठी 'मी केवळ ॲक्टर आहे, माझी काही जबाबदारी नाही' असे म्हणून कलाकारांना बाजूला होता येणार नाही. तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल तर तुमची जबाबदारी सामान्य नागरिकांपेक्षा अधिक आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, असा इशाराही मुंढे यांनी यावेळी दिला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात एफडीएकडून शाहरुख, अजय आणि टायगर आदी कलाकारांना 'विमल इलायची'च्या अप्रत्यक्ष जाहिराती प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.