"१६ पानांच्या FIR मधील १ च पान बाहेर कसे आले?" दिशा सालियन प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल
दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांचा जबाब ११ सप्टेंबर रोजी सीबीआयने नोंदवून घेतला. त्यानंतर सीबीआयने दाखल केलेल्या १६ पानांच्या एफआयआरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे आणि अभिनेता डिनो मोरिया यांच्यासह ३३ पेक्षा जास्त लोकांच्या नावांचा उल्लेख आहे. या सर्वांवर गंभीर आरोप करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तूर्तास कोणालाही थेट आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नाही. तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही आरोपी गृहीत धरू नका, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
हे राजकीय षडयंत्र आणि कारस्थान; संजय राऊत यांचा थेट आरोप
या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार निशाणा साधला. "हा अत्यंत संवेदनशील विषय असून एका मुलीच्या चारित्र्याशी जोडलेला आहे. तिचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी होता. या प्रकरणाचा तपास यापूर्वीच मुंबई पोलिसांनी पूर्ण केला आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतानाच पोलिसांनी तपास करून क्लोजर रिपोर्ट दिला होता. त्यात आदित्य ठाकरे यांचा दुरान्वयेही संबंध नाही, हे स्पष्ट झाले होते."
'बीएमसी भ्रष्टाचारावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न'
या प्रकरणाला राजकीय आखाडा बनवणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले तरी तपासापूर्वीच संशयास्पद वक्तव्ये केली जात आहेत. १६ पानांच्या एफआयआरमधील केवळ एकच पान बाहेर कसे आले, असा सवाल करत राऊत यांनी याला पूर्णपणे राजकीय षडयंत्र म्हटले आहे.