मुंबई जागतिक जेम्स-ज्वेलरी केंद्र बनावे - अमित शाह

मुंबई जागतिक जेम्स-ज्वेलरी केंद्र बनावे - अमित शाह

 

 
मुंबई : लॅब-ग्रोन डायमंडच्या (एलजीडी) वाढत्या जागतिक बाजारपेठेवर भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व मिळविले असून या उद्योगाची संपूर्ण मूल्यसाखळी भारतीयांच्या नियंत्रणात असावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत केले. हिरे व्यापार आणि निर्यात क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलेल्या मुंबईने जागतिक जेम्स-ज्वेलरी केंद्र म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या  ५२ व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पुरस्कार वितरण सोहळ्यात शाह बोलत होते. हा व्यवसाय महाराष्ट्रातून बाहेर जाऊ नये, यासाठी फडणवीस यांचा आग्रह आहे. लॅब-ग्रोन डायमंडच्या बाजारपेठेचा विस्तार ५० पट होण्याची शक्यता असून उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री, हिरे निर्मिती, दागिने तयार करणे, ब्रँड उभारणी व जगभरात शोरूम सुरू करण्यापर्यंतची साखळी भारताच्या हातात असावी, असे शाह म्हणाले.

निर्यात २.४४ लाख कोटी -
२०२५ मध्ये भारताची जेम्स-ज्वेलरी निर्यात २.४४ लाख कोटी झाली असून, या क्षेत्रातून  ७५ लाखांना रोजगार मिळतो. युरोपीय संघ, यूएई, ऑस्ट्रेलिया, ओमान व ब्रिटनसोबतच्या मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय जेम्स-ज्वेलरी उद्योगाला नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. 

सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, मंत्री ॲड. आशिष शेलार, कौन्सिलचे निमंत्रक मनसुख कोठारी  उपस्थित होते.

एक लाख कोटींची गुंतवणूक : नवी मुंबईतही जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी दसऱ्याला काम सुरू होईल. देशातील आधुनिक इकोसिस्टम उभी करत असून, याद्वारे १ लाख कोटींची गुंतवणूक व ५० हजारांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

गुणवत्ता वाढवली  :
जेम्स व ज्वेलरी उद्योगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुणवत्ता वाढविली आणि नवीन मार्केटमध्येही पदार्पण केल्याचे कौन्सिलचे अध्यक्ष भन्साळी यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्यात किरण जेम्सचे संस्थापक वल्लभभाई पटेल यांना जीवनगौरव पुरस्काराने तर हिरे उद्योगातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रिस्टल डायमंडचे अरविंद पारीख यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.