बारामतीला येणाऱ्या बसप्रवासी महिलेचे दागिने, रोकड लंपास
बारामती : कोऱ्हाळे बुद्रुक ते बारामती शटल बसने प्रवास करताना एका महिलेच्या पिशवीतील सोन्याचे तीन मणी आणि रोख रक्कम असा एकूण ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात सुरेखा भुजंग बांदल (रा.होळ,ता. फलटण) या महिलेने फिर्याद दिली.
पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी १४ ऑक्टोबर रोजी कोऱ्हाळे बुद्रुक ते बारामती या शटल बसने प्रवास करीत होत्या. त्या वेळी त्यांच्या शेजारी सुमारे ३० वर्षांची एक महिला चार वर्षांच्या लहान मुलासह बसली होती.या महिलेने फिर्यादी बांदल यांच्या पिशवीत ठेवलेले सोन्याचे तीन मणी आणि पाचशे रुपयांच्या ४७ नोटा, अशी एकूण ३८ हजार ५०० रुपयांची मालमत्ता हातचलाखीने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.संशयित महिला काळ्या-सावळ्या वर्णाची, सडपातळ बांध्याची असून तिने निळसर रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. ती हिंदी भाषेत बोलत होती,अशी माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.