पुण्यात सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई; कर्नाटकातून आलेले संशयित १०.८८ टन पनीर, खवा जप्त; ३१ लाखांचा साठा नष्ट

पुण्यात सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई; कर्नाटकातून आलेले संशयित १०.८८ टन पनीर, खवा जप्त; ३१ लाखांचा साठा नष्ट

 


पुणे : नवरात्र आणि विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मिठाई, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढलेली असतानाच, पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून पुण्यात आणलेले पनीर आणि खव्याच्या साठ्यावर छापे टाकून तब्बल १० हजार ८८८ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत ३१ लाख ६ हजार ६८० रुपये असून, असुरक्षित असल्याचा संशय आणि नाशवंत स्वरूप लक्षात घेऊन जप्त केलेला माल नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एफडीएच्या विशेष मोहिमेंतर्गत सोमवारी (दि. १९) पहाटे सहा वाजल्यापासून बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडी येथे कारवाई करण्यात आली. कर्नाटकातून पनीर घेऊन आलेल्या तीन वाहनांची तपासणी करण्यात आली. याशिवाय, कसबा पेठेतील दगडे पूल परिसरातील शिवशंकर डेअरी येथे खव्याचा साठा आढळून आला.

तीन वाहनांत साडेदहा हजार किलो पनीर

बावधन येथे एका वाहनातून ३ हजार ५२० किलो पनीर आढळले. त्याची किंमत १० लाख ५६ हजार रुपये आहे. कसबा पेठेत दुसऱ्या वाहनातून ३ हजार २३५ किलो पनीर जप्त करण्यात आले. त्याची किंमत ८ लाख ३ हजार २२० रुपये आहे. बिबवेवाडी येथे तिसऱ्या वाहनातून ३ हजार ४१३ किलो पनीर आढळले. त्याची किंमत १० लाख ३१ हजार ४६० रुपये आहे.

दरम्यान, कसबा पेठेतील डेंगळे पूल परिसरातील शिवशंकर डेअरी येथे ७२० किलो खवा आढळला. त्याची किंमत २ लाख १६ हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १०.८८ टन पनीर आणि खवा जप्त करण्यात आला.

तापमान नियंत्रणाचा अभाव, उघड्यावर विक्री

तपासणीदरम्यान पनीर आणि खव्याची वाहतूक व साठवणूक योग्य तापमानात होत नसल्याचे आढळले. तसेच लो-फॅट आणि मीडियम-फॅट पनीरची सीलबंद पॅकिंगमध्ये विक्री करणे अपेक्षित असताना, काही ठिकाणी ते उघड्यावर आणि अस्वच्छ वातावरणात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हे पदार्थ मानवी सेवनासाठी असुरक्षित असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कार्यवाही सुरू आहे.

सणासुदीच्या काळात मिठाई, मावा, खवा, पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी ग्राहकांनी पदार्थांची गुणवत्ता, पॅकिंग, उत्पादन व वापरण्याची अंतिम तारीख आणि साठवणुकीची स्थिती तपासावी. खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. दुग्धजन्य पदार्थांमध्ये इतर वनस्पतीजन्य फॅट किंवा घटकांची अनधिकृत भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. - दिगंबर भोगावडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे.